मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठा पाण्याखाली

संगमेश्वर:- सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या रामपेठ, माखजन, फुणगूस बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. दुकानातील तसेच पूरग्रस्त घरातील रहिवाशीयांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जुलै महिन्यातील सलग तिसऱ्या रविवारी संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात पुराचे पाणी भरले आहे.

संगमेश्वर तालुक्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. रविवारी सकाळच्या दरम्याने मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळी वाढ होऊन पुराचे पाणी सखल भागातील बाजारपेठेमध्ये घुसले आहे. संगमेश्वर जवळची रामपेठ ही बाजारपेठ आहे. शास्त्री नदीजवळ असलेल्या या बाजारपेठेत पुराचे पाणी लवकर भरते.रविवारी सकाळच्या दरम्याने रामपेठेमधील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते तसेच रामपेठ मधील काही दुकानात हे पाणी घुसल्याने तेथील माल सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे.

संगमेश्वर खाडीपत्त्यातील फुणगूस मधील काही घरांना तसेच दुकानांना पुराचा फटका बसलेला आहे. संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावर बुरंबी याठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर तीन फूट होते त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कसबा बाजारपेठेत पुन्हा पुराचे पाणी घुसून काही घरांना फटका बसला तर नायरी , फणसवणे कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यातील गडनदी धरण तुडूंब भरले असून नदीकिनारी असलेल्या मुरडूव, आरवली, खेरेशतसह माखजन पट्ट्यातील गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आली आहे. फुणगूस बाजारपेठेतील काही घरांना पुराचा फटका बसला आहे.