तुटलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने वृद्ध शेतकऱ्यासह गाईचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील तिसंगी – बर्गेवाडी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे झाडाची फांदी विद्युत तारेवर पडून त्या तारेचा स्पर्श गाईला झाला. त्या गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला शॉक लागून त्यांचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी खेड पोलीस तसेच महावितरणचे अधिकारी पोहचले असून ह्या घटनेबाबत पंचनामा सुरू केला आहे.

शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिसंगी बर्गेवाडी येथील बाळ रानामध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. याच दरम्यान तिसंगी बर्गेवाडी येथील विद्युत भारित तार तुटून गाईच्याच्या अंगावर पडली. गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच गावातील बाबू कोंडू बर्गे (वय 80 वर्ष) या शेतकऱ्याचा देखील विद्युत स्पर्थ झाल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. मृत्युमुखी पडलेल्या 80 वर्षीय वृद्ध शेतकरी बाबू बर्गे यांना शवविच्छेदनासाठी खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.

ही घटना कशी झाली. याबाबत घटनास्थळावरून माहिती घेतली असता तिसंगी बर्गेवाडीच्या हद्दीमध्ये अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये ही घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाची फांदी विद्युत पोलवर पडली. अशात तार तुटून गाईवर पडली त्या गाईला वाचण्यासाठी गेलेल्या बाबू धोंडू बर्गे या 80 वर्षे वृद्ध शेतकऱ्याला देखील विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली आहे.