संगमेश्वर:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील रामपेठ ,माखजन आणि कसबा बाजारपेठेसह मुख्य बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या शास्त्री, सोनवी ,गडगडी आणि बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शास्त्री नदीचे पाणी रामपेठ बाजारपेठेमध्ये घुसल्याने येथील व्यापाऱ्यांची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. तसेच संगमेश्वर असुर्डे जोड रस्त्याला पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे . कसबा बाजारपेठेलाही पुराचा फटका बसला असून काझीमोहल्ला या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर चढले आहे त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे . फुणगुस मार्गावर आंबेड येथे पाणी चढल्याने मार्ग बंद झाला आहे. संगमेश्वर बाजारपेठे मधील मच्छी मार्केट पाणी घुसल्याने मच्छी मार्केट बंद झाले. गडनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी माखजन बाजारपेठेमध्ये घुसले आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे मुसळधार पावसाचा फटका एस टी वाहतुकीलाही बसला असून अनेक प्रवासी संगमेश्वर बस स्थानकामध्ये अडकून पडले होते.