रत्नागिरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्याला रविवारी पावसाने चांगलेच झोडपले. ग्रामीण भागातील छोट्या नद्यांची पात्र भरुन वाहत होती. काजळी नदीही दुथडी भरुन वाहत होती. ग्रामीण भागात तीन ते चार ठिकाणी झाडाच्या फांद्या पडून घर व गोठ्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर चांदेराई व परिसरातील सहा गावात नदी ओलांडणारी मुख्य वाहिनी तुटल्याने सुमारे पाच हजार ग्रामस्थ दिवसभर अंधारात होते. पावसामुळे दिवसभर वातावरणात गारवा पसरला होता.

शनिवारी सायंकाळीपासून रविवारी दिवसभर रत्नागिरी तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. ग्रामीण भागातील नद्यानाले दुथडी भरुन वाहत होते. काजळीनदी इशारा पातळीच्याजवळून वाहत होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री काजळी नदीच्या किनार्‍यावरील गावांमध्ये पाणी भरण्याचा धोका ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात होता. ग्रामीण भागात तीनचार ठिकाणी झाडाच्या फांद्यापडून नुकसान झाले असून, प्रशासनाकडे त्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, चिंद्रवली, उमरे, कोंडवी व टिके परिसराला वीज पुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी तुटल्याने रविवारी पहाटेपासून या गावचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. ही मुख्य वाहिनी कोंडवी गावात काजळी नदीच्या वरुन जात असून ती तुटल्याने नदीतून जाऊन वाहिनी टाकावी लागणार आहे. पाण्यालाही प्रवाह मोठा असल्याने सायंकाळी उशिरापयर्र्त महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले नव्हते. अधिकारी वर्गाकडून लवकर काम केले जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले जात होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत हे काम न झाल्याने ग्रामस्थांना रात्रही अंधारात काढावी लागण्याची शक्यता भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी व्यक्त केली.