गुहागर:- गुहागर बाजारपेठेच्या समोरील समुद्रामध्ये रविवारी (दि. १४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास असगोली येथील मच्छीमारी नौका बुडाल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले. या बोटीचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
असगोलीहून दुरूस्तीसाठी ही नौका गुहागर समुद्रकिनारी नेण्यात येत होती. या बाबत गुहागर आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, असगोली येथून गुहागर समुद्राकडे ‘शिवाय’ नावाची अनुराग जितेंद्र जांभारकर यांच्या मालकीची (आयएनडी- एमएच४-एमएम-५१४९) ही बोट येत असताना वारा व लाटांमुळे ती समुद्रात बुडाली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मासेमारी बंदी कालावधी काही दिवसांनी संपणार असल्याने बोटीची डागडुजी व पूर्वतयारीकरिता ही बोट गुहागर समुद्रकिनारी नेण्यात येत होती. यावेळी हा अपघात घडला. सदर बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मुसळधार पाऊस व लाटांमुळे अडथळा निर्माण होत आहे.