अठरा तासांपासून कोकण रेल्वे ठप्पच; अतिवृष्टीमुळे आणखी काही तास लागण्याची शक्यता

रत्नागिरी:- राज्यात रविवार मुसळधार पावसाने कहर केला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तब्बल 15 तास उलटल्यानंतरही अजूनही कोकण रेल्वे ठप्पच आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे.

दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अति मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती कोकण रेल्वेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडावं असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.