रत्नागिरी:- जिल्हा परिषदेला पुन्हा नव्याने झालेल्या शिक्षक भरतीतील उमेदवारांच्या कागद पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 367 शिक्षकांपैकी 27 शिक्षकांनी या पडताळणीला दांडी मारली आहे. यामुळे आता 340 शिक्षक मिळणार हे निश्चित झाले आहे. येत्या 10 दिवसांत या शिक्षकांना शाळा मिळणार आहे.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार-पाच वर्षात दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वळ ठरला होता. मात्र रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जि. प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास 2 हजार पदं रिक्त होती. मात्र शासनाने 1 हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात 997 शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता.
ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा 367 शिक्षकांना पवित्र पोर्टलवरून भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी मंगळवार, बुधवारी जि. प. भवनात आयोजित करण्यात आली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. 27 उमेदवार गैरहजर राहिले, त्यामुळे 367 पैकी 340 शिक्षक पात्र ठरले आहे. आता या उमेदवारांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना शाळा देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 10 दिवसात पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.