चिपळूण येथे भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

चिपळूण:- येथील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात काल, शुक्रवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थी सिद्धांत प्रदीप घाणेकर मूळचा दापोली देहगाव येथील रहिवासी आहे. विद्यार्थ्यांची शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेमुळे डीबीजे महाविद्यालय बंद ठेवण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत रस्तालगत विविध ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आल्या. डिबीजे महाविद्यालयाच्या आवारातही महामार्ग लगतच संरक्षित भिंत उभारण्यात आली होती. त्या आरसीसी संरक्षक भिंतीवर आणखी जांभ्या स्वरूपाची संरक्षक भिंत डीबीजे महाविद्यालयाने उभारली होती. या भिंतीखाली एकाने वडापावची हातगाडी उभारली होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेहमी उठबस असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही वडापावची गाडी बंद होती. तरी देखील काही विद्यार्थी तेथे बसण्यासाठी जात असत.

अशातच जांभ्याच्या संरक्षक भिंतीचे काही दगड शुक्रवारी सकाळी अचानक कोसळले. किरकोळ घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु संबंधित विद्यार्थी हा महाविद्यालयातून सायंकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती. अशातच शनिवारी सकाळी तो भिंतीखाली चिरडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.

तात्काळ तेथील दगड हटवून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. संबंधित विद्यार्थी हा मूळचा दापोली देहगाव येथील रहिवासी असला तरी तो शिक्षणासाठी लोटे येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता.