दुसऱ्या टप्प्यात ३४० शिक्षकांची कागदपत्र ग्राह्य 

 रत्नागिरी:- पवित्र पोर्टलवरून रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या ३६७ शिक्षकांपैकी कागदपत्र पडताळणीवेळी २७ जण गैरहजर राहिले. उपस्थित ३४० जणांची कागदपत्र ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यांचे समुपदेशन लवकरच करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता गेल्या चार-पाच वर्षांत सुधारताना दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला होता; मात्र, रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्यामुळे शैक्षणिक कारभार चालवताना जिल्हा परिषद प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदे रिक्त होती. शासनाने १ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात ३६७ शिक्षक जिल्ह्याला मिळाले होते. त्यामध्ये मराठी आणि उर्दू दोन्हीचा समावेश आहे. ही भरती पवित्र पोर्टलवरून करण्यात आली आहे. त्या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी मंगळवार, बुधवारी जिल्हा परिषद भवनात आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसात 340 उमेदवार उपस्थित होते. 27 उमेदवार अनुपस्थित होते. ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार यांच्या मार्गदर्शनाखाली चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी येत्या काही दिवसात समुपदेशन आयोजित केले जाणार आहे तसेच टीईटी परीक्षेतील गोंधळामध्ये जे उमेदवार सापडले होते त्यातील दोनजणांच्या नियुक्त्या रत्नागिरीत झाल्या आहेत. त्यांना चारित्र्य पडताळणीचे दाखले सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.