रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा

रत्नागिरी:- ‘गोमाता के सन्मान मे, हर हिंदू मैदान मे’, ‘पोलीस प्रशासन हाय-हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत सकल हिंदू समाजाचा दणदणीत मोर्चा रविवारी पोलीस अधिक्षक कार्यालयावर निघाला. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत रास्तारोको करण्यात आला.

गुरुवारी एमआयडीसी परिसरात उपयुक्त प्राण्याच्या पिल्लाचे मुंडके सापडल्याने ही गोवंश हत्या असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आला. गेले 2 दिवस या प्रकरणात वातावरण तप्त होते. त्यातच माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोर्चाचा इशारा दिला. त्यानुसार रविवारी रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा काढण्यात आला.

सकाळी 11.30 वा.च्या सुमारास मारुती मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्त्व महिलांनी केले होते.

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा निघणार असल्याने सकाळपासून रत्नागिरी शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रायगड, सिंधुदुर्ग आदी ठिकाणाहून जादा कुमक मागवण्यात आली होती. मारुती मंदिर ते जेलनाका या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे निघाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी होत होती. हा मोर्चा पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळ आला असता त्याठिकाणी मोर्चा अडवण्यात आला. पोलिसांनी त्याठिकाणी बॅरिकेटींग केले होते. स्वत: अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड या त्याठिकाणी तैनात होत्या.

पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वत: मोर्चेकर्‍यांना संबोधित करावं, आमचं शिष्टमंडळ जाणार नाही, अशी भूमिका सकल हिंदू समाजाच्यावतीने घेण्यात आली.

रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी हे काही वेळानंतर सुरक्षेच्या गराड्यात आपल्या केबिनमधून बाहेर पडले आणि ते थेट मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले. यावेळी पोलिसांनी आजपर्यंत कसा तपास केला याची माहिती दिली व माहिती देत असतानाच आंदोलक व पोलीस अधिक्षक यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.

ही गोवंश हत्याच आहे, आरोपीला माफी नाही, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी मांडली. तुम्ही कोणती कलमं लावली आहेत? आरोपीला जामीन होईल, अशी कलमं लावू नका, हे सर्व संघटीत होत आहेत, त्यामुळे आरोपींना मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आपण एका संशयिताला अटक केली आहे अशी माहिती दिली आणि पुन्हा एकदा गदारोळाला सुरुवात झाली. अटक केलेला आरोपी कोण? त्याला कोर्टात हजर का केले नाही? यावरुन पुन्हा पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.

आंदोलकांशी चर्चा करून पोलीस अधिक्षक निघून गेले मात्र जोपर्यंत आपल्याला ठोस कारवाई केल्याचे पुरावे देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. थोडावेळ वाट पाहून माजी खासदार निलेश राणे यांनी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आणि सर्व आंदोलक जेलनाक्यात आले व त्याठिकाणी रास्तारोकोला सुरुवात झाली.

रास्तारोेको सुरु झाल्यानंतर दुतर्फा आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यामुळे मारुती मंदिरकडून येणारी तर बसस्थानकाकडून मारुती मंदिरच्या दिशेने जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. यावेळी आंदोलकांनी भजन गाण्यास सुरुवात केली. संगीतमय भजनाने सारा परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

नुकतीच अमावस्या झाली त्यामुळे जिल्ह्यात गेले दोन दिवस धुँवाधार पाऊस कोसळतोय. भर पावसात आंदोलक जेलनाक्यात ठिय्या मांडून बसले होते. त्यामध्ये महिला वर्गाचादेखील मोठा सहभाग होता. जोपयर्र्ंत आरोपीला कोर्टात हजर करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असाच पवित्रा सर्वांनी घेतला होता.

हे आंदोलन सुरु असतानाच एक पोलीस अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले व त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांना अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले आहे, अशी माहिती दिली. ही माहिती मिळताच आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला.