नवजात अर्भकाचा खून करणाऱ्या मातेचा जामीन फेटाळला

रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात अर्भकाचा खून केल्याचा आरोप असलेल्या महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सुचिता अजित पटेकर (४४, रा. वरवडे रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. वरवडे भंडारवाडी येथील खाडीच्या खाजणात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. तपासामध्ये या महिलेनेच या अर्भकाला मारल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्याविरूद्ध आता खूनाचा खटला चालवला जात आहे.

रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०१९ रोजी खालचे वरवडे येथील पोलीस पाटील नंदकुमार सीताराम खेडेकर (५६) यांनी वरवडे भंडारवाडीत खाडीच्या खाजणीत मृत स्त्री जातीचे अर्भक असल्याची खबर जयगड पोलिसांत दिली होती. २४ तासापूर्वी जन्मलेले मृतावस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान या प्रकरणी जयगड पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासामध्ये हे अर्भक वरवडे येथील ४० वर्षीय महिलेचे असल्याचे तपासामध्ये समोर आले होते. ही महिला विवाहित असून गेल्या अनेक वर्षापासून ती नवऱ्यापासून वेगळी राहते. तिचे गावातील तरूणासोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती गर्भवती राहिली होती. आपले संबंध सर्वांसमोर उघड होतील, या भीतीने तिने जन्मतःच या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले. जयगड पोलिसांनी सुचिता पटेकर हिच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२, ३१५, २०१, ३१८ नुसार गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयाने आपल्या निकालात सांगितले की, प्रेमसंबंधातून जन्मलेल्या मुलाचा खून करणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, या खटल्यामध्ये आणखी काही महत्वाचे साक्षीदार न्यायालयापुढे तपासायचे आहेत. आरोपीविरुद्धच्या गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असून जामीन मिळवण्यास पात्र ठरत नाही, असे नोंदवत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.