संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ नजीक मार्गावर बुधवार ( ३ जुलै २०२४) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. बोलेरोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत दुचाकी चालक विघ्नेश करंडे हा जागीच ठार झाला.
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ नजीक हरेकरवाडी (स्मशानभूमी) जवळ घडलेली दुर्घटना ही बोलेरो चालकाच्या चुकीमुळे घडल्याचे वृत्त आहे. चिपळूणच्या दिशेने बोलेरो गाडी घेऊन चालक परेश देवरुखकर (गाडी क्रमांक MH 08 W 3563) हा जात होता. तर समोरून येणारा दुचाकी चालक विघ्नेश करंडे हा आपल्या दुचाकीने (MH 08 AB 4692) आरवलीहुन धामणीच्या दिशेने येत होता. विघ्नेश हा आपल्या भावाला सोडून दुचाकीने तुरळ नजीक हरेकरवाडी जवळ आला असता सुसाट समोरून येणाऱ्या बोलेरो चालक परेश देवरुखकर याने दुचाकीला जोरदार धडक दिली. बोलेरोने दिलेली धडक इतकी जोराची होती की, दुचाकीचे पुढील चाक तुटून विघ्नेश हा तब्बल शंभर फुटावर जाऊन पडला. यामध्ये विघ्नेशचे हात-पाय तुटले, यातच विघ्नेश गतप्राण झाला. तसेच अपघातग्रस्त बोलेरो गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटी झाली. या बोलेरो गाडीत
चार जण बसले होते. यातील छोटी मुलगीही बेशुद्ध अवस्थेत आहे, तर उर्वरित तीन जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ रत्नागिरी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची भीषणता छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच तुरळ येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. निपचित पडलेलेल्या विघ्नेशला पाहून ग्रामस्थांना देखील दुःख अनावर झाले. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माखजन पोलीस बीट अंमलदार घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. त्यानंतर विघ्नेश करंडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
काळाने झडप घातली…
करंडे कुटुंबातील आई-वडिलांचा विघ्नेश हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विघ्नेश्वर काळाने झडप घातली. विघ्नेश हा अत्यंत मनमिळावू होता. त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच तुरळ परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.