रत्नागिरी:- जिल्हा परिषदला पुन्हा नव्याने 367 शिक्षक मिळणार आहेत. पवित्र पोर्टलवरून ही भरती करणार असून येत्या पंधरा दिवसात या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी होणार आहे. यामुळे महिनाभरात हे शिक्षक कामावर रुजू होतील.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार-पाच वर्षात दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वळ ठरला होता. मात्र रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जि.प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास 2 हजार पदं रिक्त होती. मात्र शासनाने 1 हजार पदं भरण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात 997 शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता.
ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मराठी माध्यमासाठी 348 व उर्दू माध्यमासाठी 19 शिक्षक पवित्र पोर्टलमधून भरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून येत्या पंधरा दिवसात या शिक्षकांची कागदपत्रांची तपासणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर या शिक्षकांना नियुक्त देण्यात येणार आहे. यामुळे महिनाभरात हे शिक्षक शाळेवर रुजू होणार आहेत. यामुळे आता शिक्षकांच्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवे शिक्षक मिळाल्याने आता फक्त 657 पदे रिक्त आहेत.
आंतरजिल्हा बदल्यांचा विचार नाही…
आंतरजिल्हा बदली हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. गतवर्षी तर 700 शिक्षकांना एका रात्रीत सोडण्यात आले होते. याबाबत प्रशासनाला विचारले असता जिल्ह्यात अजूनही 657 पदे रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना सोडण्यात येणार नाही, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली.