केळशीमध्ये अंमली पदार्थासह चार मुलांना घेतले ताब्यात

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी येथे चरस आणि गांजा सेवन करणार्‍या 4 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असणारे चिलीम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. संशयित मुख्य सूत्रधार फरारी झाला होता. मात्र त्याला दुसर्‍या दिवशी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

केळशी गुजरवाडा येथील खाडीकिनारी असलेल्या छोट्या जेटीवर नेहमी रात्री अपरात्री दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी काही तरूण जात असतात. रविवारी 6.30वा.च्या सुमारास एका मुलाचा संशय आल्याने स्थानिक ग्रामस्थ विचारणा करण्यास गेले असता त्यांच्याकडे चिलीम सापडली आणि हा प्रकार जेटीवर असणार्‍या इतर 3 मुलांना समजल्यावर त्यांनी काही वस्तू फेकून दिल्या. यातील मुख्य सूत्रधार घटनास्थळावरून पसार झाला व अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गांजा ओढणारी चिलीम सापडली.मुख्य सूत्रधाराची गाडी तेथेच ठेवण्यात आली होती. परंतु चावी त्याच्याकडे असल्याने तो सकाळी पहाटे कोणी नसताना गाडी घेऊन जाण्याच्या उद्देशाने आला तेव्हा ग्रामस्थांनी पकडले. त्याच्याकडेही चिलीम आणि वापर केलेला कागद सापडले आणि इतर तिघांमधील एकाचा मोबाईल सापडला आहे. रविवारी संध्याकाळी आडे दूरक्षेत्राचे अंमलदार राजू मोहिते यांनी तिघांना, तर मुख्य सूत्रधाराला दुसर्‍या दिवशी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करत आहेत.