सराईत चोरट्याला न्यायालयाकडून तीन वर्ष कारावास

संगमेश्वर:- संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला देवरुख न्यायालयाने तीन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मनोज उर्फ सुरज गोविंद कदम (36, राहणार देवरुख रोहिदास वाडी तालुका संगमेश्वर) याने संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये घरफोडी करून किमती ऐवज लंपास केला होता.

आरोपी सुरज कदम याला संगमेश्वर पोलिसांनी देवरुख न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपीला तीन वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील श्रीमती सुप्रिया वनकर, तसेच पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, तपासी पोलीस हवालदार सी पी चव्हाण, एस एस कामेरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे