रत्नागिरी:- शासनाच्या निर्णयानंतरही बहुतेक शाळा अजूनही सकाळी 7 वाजताच भरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. शिक्षणाधिकार्यांच्या परवानगीविना सकाळी 9 वाजण्यापूर्वी शाळा भरत असतील, तर अशा शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी एका जाहीर कार्यक्रमात शाळांच्या वेळा बदलण्याबाबत वक्तव्य केले होते. याची दखल घेत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. 8 फेब्रुवारी रोजी परीपत्रक काढत सन 2024-25 या नवीन शैणिक वर्षापासून वेळेत बदल जिल्हा करण्याची सूचना शाळांना केली होती. या सूचनेचे पालन होते का नाही हे पाहण्याची जबाबदारी शिक्षण संचालकावर सोपवली होती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी विविध शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील विविध अधिकार्यांचे अभिप्राय मागवून सकाळी 7 नंतर भरणार्या शाळेच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. तसेच या निर्णयाबाबत काही हरकती किंवा अडचणी असतील तर शाळांनी शिक्षणाधिकार्यांना पत्र लिहून परवानगी घेणे अपेक्षित होते. नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाल्यानंतर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून आपल्या वेळेत बदल केला आहे. मात्र, अजूनही बर्याच शाळांनी या परिपत्रकांची अंमलबजावणी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी 7 ऐवजी 9 किंवा त्यानंतर करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्यापूर्वीची आहे. त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्या शाळेच्या व्यवस्थापनाने तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांशी संपर्क साधून मार्गदर्शन घेवून नंतर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अडचण सोडविण्यासाठी मार्गदर्शन घेण्याबाबत कार्यवाही करावी.