दापोली:- दापोली तालुक्यातील गव्हे येथील सिया सूरज म्हाब्दी या विवाहितेने तिच्या दोन वर्षांच्या मुलासह घराच्या आवारात असलेल्या विहिरीत उडी मारून काल (ता. २८) आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीचा सासरी छळ केला जात असल्याने तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार सिया म्हाब्दीच्या भावाने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली असून, ४ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २८ जूनला सिया सूरज म्हाब्दी हिने मुलगा समर याच्यासह घराच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. २६ एप्रिल २०२१ ते २८ जून २०२४ या कालावधीत सिया म्हाब्दी हिचा पती सूरज संजय म्हाब्दी, संजय पांडुरंग म्हाब्दी (सासरे), सुजाता संजय म्हाब्दी (सासू), आकाश संजय म्हाब्दी (दीर, सर्व रा. गव्हे) यांनी शिवीगाळ, मारहाण करून क्रूर वागणूक दिली. तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिचे व भाचा समर यांचे जगणे असह्य केले. त्यामुळे तिने आत्महत्या केली, अशी तक्रार सियाचा भाऊ विनोद विजय गुरव याने दापोली पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार या चारही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल गंगाधर करत आहेत.