लाकडाने भरलेला ट्रक पलटी होऊन कामगाराचा मृत्यू 

चिपळूण:- लाकडाने भरलेला ट्रक पुढे जाताना पलटी झाल्याने त्याखाली सापडलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील असुर्डे-चोगलेवाडी येथे घडली. या अपघाताप्रकरणी कोल्हापूर येथील ट्रक चालकावर सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुधाकर विश्वास शिंदे (28, वारणा पारगांव ता. हातकणगले जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच विठ्ठल तानू खापरे (60, असुर्डे-जांभूळवाडी) असे मृत्यू झालेल्या तर दत्ता नलावडे (65, चिपळूण) असे जखमी झालेल्या कामागाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर शिंदे हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेऊन तो असुर्डे-चोगलेवाडी ठिकाणी लाकूड भरण्यासाठी आला होता. या ट्रकमध्ये गावातील कामगाराच्या मदतीने लाकडे भरुन झाल्यानंतर सुधाकर याने हा ट्रक पुढे घेऊन जात त्याने रस्त्याच्या विशिष्ठ परिस्थितीकडे लक्ष न देता तो अविचाराने ट्रक चालवत असताना पलटी झाला.

त्याखाली लाकडे भरण्यासाठी आलेले कामगार दत्ता नलावडे व विठ्ठल खापरे हे दोघेजण सापडले. त्यामध्ये नलावडे याला दुखापत झाली असून खापरे हे यात गंभीररित्या जखमी झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कोल्हापूर येथील ट्रक चालक सुधाकर शिंदे याच्यावर सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.