रेल्वे चोरीतील पसार चोरट्याला शहर पोलिसांकडून बेड्या

रत्नागिरी:- रेल्वेत चोरी करुन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या खबऱ्यांच्या संपर्कात आल्याने हा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला. ही कारवाई शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली. प्रसाद जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे चोरट्याचे नाव आहे. ही घटना २६ मे २०२४ ला रेल्वेत घडली होती.

अन्नमा जोसफ (५६, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) हे केरळ ते मुंबई प्रवास करत होते. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरिल आडवली ते रत्नागिरी दरम्यान झोप लागली. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची बॅग व दहा लाखाचे दागिने चोरुन नेले. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडले. प्रसाद पाटील हा मडगाव येथील पोलिसांच्या खबऱ्याच्या संपर्कत होता ही बाब लक्षात येताच शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मडगाव येथून प्रसाद पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिपक साळवी, पोलिस हवालदार अरुण चाळके, राहूल जाधव, अमोल भोसले, पोलिस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर पोलिस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.