कुवारबाव येथील प्रश्न निकाली; बाजारपेठेतून सरळ मार्ग होणार

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात शहरानजिकाच्या कुवारबाव येथील बाजारपेठ वाचविण्यासाठी उड्डाण पुल की सर्व्हिस रोड याबाबत येथील व्यापारी व रहिवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र तो संभ्रम अखेर दूर झाला असून कुवारबाव बाजारपेठेतून सध्या असलेल्या मार्गावरील चौपदरीकरणाद्वारे सरळ मार्ग तयार केला जाणार असल्याने महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तयार केला जात असताना या महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये असलेली संपूर्ण कुवारबाव बाजारपेठ अस्ताव्यस्त झाली. या बाजारपेठ परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मीटर जागा संपादित करण्यात आली. महामार्र्गाचे काम सुरू होते त्यामध्ये आलेली बाजारपेठेतील दुकाने, गाळे आदी हटविण्यात आले. पण हा महामार्ग चौपदरीकरण करताना बाजारपेठ वाविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संभ्रम तेथील व्यापारी व ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला होता. सुरूवातीला त्या बाजारपेठेतून उड्डाणपूल बांधला जाणार असल्याची शक्यता होती. ही बाजारपेठ उध्दवस्त होणार असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी केंद्रीय रस्ते मंत्री ना.नितीन गडकरींपर्यंत धाव घेतलेली होती. कुवारबाव बाजारपेठ वाचण्यासाठी आपले गाऱ्हाणे देखील मांडलेले होते. बाजारपेठ जाणार असेल तर सहकार्य करण्याची भूमिका व्यापारी वर्गाने देखील घेतलेली होती. पण त्याबाबत निर्णय निश्चित झालेला नव्हता. या बाजारपेठेतून उड्डाणपूल असेल तर त्याला सर्व्हिस रोड कसा असेल, किती उंचीचा असेल, याबाबत व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम कायम राहिला होता.

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणात कुवारबाव बाजारपेठेतील दुकाने पाडून रुंदीकरणाचे काम सध्या अधिक वेगाने सुरू आहे. कुवारबाब बाजारपेठ उध्वस्त होणार असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी यापूर्वी विरोध केला. अनेक वेळा भूसंपादनाचे काम थांबविले होते. पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्यात आले होते. मात्र मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने देखील केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली होती. परंतु या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रकल्प असल्याने यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
कुवारबाव बाजारपेठेत उड्डाणपुलाचा विषय प्रस्तावित करून दोन्ही बाजुंंनी समान जागा जावी, यासाठी हा तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार ही पंधरा मीटरची जागा संपादित करण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या कामाला स्थानिक व्यापाऱ्यांनीही या कामाला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारल्याने या भागातून वेगाने काम सुरू झाले. पण कुवारबाव येथे बाजारपेठ वाचविण्यासाठी उड्डाण पुलाचा प्रस्ताव जरी ठेवण्यात आला तरी त्याबाबत येथील व्यापारी व ग्रामस्थ, नागरिकांमध्ये संभ्रम कायम राहिला होता. पण कुवारबाव बाजारपेठ या ठिकाणहून पूर्वी असलेल्या मार्गावरून चौपदरीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील विस्थापित झालेल्या पूर्वीच्या बाजारपेठेतूनच हा महामार्ग जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर महामार्ग चौपदरीकरणातील आणखीन काही कामांमध्ये मिऱ्या-नागपूर महामार्गावर याठिकाणी येणाऱ्या एकूण 87 बसस्टॉप होणार आहे. साखरपा-करंजारी येथे या महामार्गावर टोलनाका बसणार आहे. महामार्गावर शहरी भागात 32 हायमास्ट बसविण्यात येणार आहेत. साखरपा-दाभोळे येथे 1.6 कि.मी. बायपास तयार केला जाणार आहे. रत्नागिरी टप्प्यातील महामार्गावर 7 वृक्षांची नव्याने लागवड होणार आहे. विविध ठिकाणी 61 जंक्शन विकसित केली जाणार आहेत. महामार्गावर मध्यभागी असलेल्या 5 मीटरच्या दुभाजकात शोभिवंत झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.