देवरूख:- नजीकच्या साडवली येथे बोलेरो-दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोसुंब फौजदारवाडी येथील प्रदीप शंकर गुरव या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.
प्रदीप गुरव हा गेली अनेक वर्षे जुगाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कोसुंबचा सचिव म्हणून कार्यरत होता. चांगल्या कामाच्या माध्यमातून प्रदीप याने तरूणांना आदर्श घालून दिला आहे. प्रदीपच्या पार्थिवावर कोसुंब येथील स्मशानभूमीत सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवरूख-संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात धडक होवून २० रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास अपघात झाला. सांगवे
येथील स्वप्निल शेलार हा बोलेरो पिकअप सांगवे ते कोसुबमार्गे साडवली अशी घेवून जात होता. त्याच्यासमवेत ऋत्विक सुहास शेलार हा ही होता. साडवली येथे स्वप्निल शेलार याने बोलेरो अचानक वळविल्याने मोटारसायकल बोलेरो पिकअपवर येवून धडकली. मोटारसायकल प्रदीप शंकर गुरव चालवत होता. यात प्रदीप गुरवच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातप्रकरणी स्वप्निल शेलार यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रदीपवर रत्नागिरी येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रदीप हा गेले ७ दिवस मृत्यूशी झुंजत होता. अखेर ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी सकाळी ९ वा. प्रदीपची प्राणज्योत मालवली. प्रदीपचे पार्थिव कोसुंब येथील निवासस्थानी आणण्यात आले. येथीलच स्मशानभूमीत शोकाकुल वातारवणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत हुशार, प्रामाणिक, कार्यतत्पर अशी प्रदीपची ख्याती होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.