कोकण पदवीधर मतदारसंघामधील 13 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

रत्नागिरी:- कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत कोकण पदवीधर मतदारसंघात दिसून येत आहे. मागील 12 वर्षे कोकणचे पदवीधर आमदार म्हणून कार्यरत असलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरूद्ध राजकारणातील मुरब्बी, अनुभवी असे म्हाडाचे माजी सभापती, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी दंड थोपटले. मतदारसंघात दोन्हीही उमेदवारांनी मतदार नोंदणीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. यामुळे मतदारांची नोंदणी चांगलीच झाली. मात्र त्यामानाने मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसत आहे. तरीही मविआचे उमेदवार रमेश कीर यांची बाजू भक्कम असल्याची चर्चा होती.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत पार पडली. एकूण 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. दुपारपर्यंत जिल्ह्यात पदवीधर मतदारांनी उत्तम प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक रिंगणातील प्रमुख दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात तर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी रत्नागिरीत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
कोकण पदवीधर मतदार संघातील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली.

दुपारी 1 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 8 हजार 27 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर पुढील दोन तासात त्यामध्ये वाढ होत 11 हजार 236 मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते. त्या पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यात 49.54 टक्के, पालघरमध्ये 46.77 टक्के, ठाणे 45.54 टक्के, रायगड 48.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाही तसेच मतदान केंद्रे गावांपासून दूर असतानाही पदवीधर मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी सपत्नीक रत्नागिरी शहरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्राबाहेर महायुती, महाविकास आघाडीचे बुथ लावण्यात आले होते. येथे दोन्हीही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांची उत्स्फुर्त गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अखेरच्या तासाभरात शिल्लक राहिलेल्या मतदारांनी काही मतदानकेंद्रांवर गर्दी केली होती. मतदार संघातील तेराही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या खेड येथे एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर रात्री उशिरा खेड येथून सर्व मतपेट्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर सील करून ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव दलाची तुकडी, रायगड पोलिसांचे विशेष पथक परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.