एसटीचालकास मारहाण प्रकरणी सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू

देवरूख:- देवरूखमधील एसटीचालक मारहाणप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मारहाण कोणी केली याचा तपास अजूनही पोलिस करत आहेत.

देवरूख आगारातून काल सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बडदवाडीकडे जाण्यासाठी सुटलेल्या बसची रिक्षेला धडक बसली. यामध्ये रिक्षा उलटली आणि एका प्रवाशाला दुखापत झाली. या अपघाताची तक्रार देण्यासाठी जाणारे बसचालक सुनील पाटील हे पोलिस ठाण्यात जात होते. अपघाताच्या ठिकाणी जाऊ या असे सांगून एका चारचाकीतून आलेल्या व्यक्तीने बसचालक पाटील यांनी गाडीतून नेले. वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांनी त्या वाहनातील व्यक्तींने पाटील यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याबाबत एसटी चालक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञातावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र पाटील यांना कोणी मारले त्याचा अजूनही तपास लागलेला नाही. सीसीटिव्ही कॅमेरामध्ये संबंधित गाडीचा क्रमांक सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काल सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत बसस्थानकातून एकही बस फेरी सुटलेली नव्हती. पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी चालक-वाहकांची भेट घेऊन बस फेऱ्या बंद ठेऊ नका, असे आवाहन केले होते. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेतले गेले.

प्रवाशांचा खोळंबा

रविवारी देवरुख येथे आठवडा बाजार असल्याने हजारो प्रवासी देवरुख आगारात होते. बस फेऱ्या न सुटल्याने त्यांचे हाल झाले. काहींनी खासगी वाहनातून घर गाठले. पाटील चालकाला मारहाण करणारी व्यक्ती एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रकरणावर पोलिस यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.