मांत्रिकाच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील रिक्षा चालकाला बेड्या

रत्नागिरी:- तुमच्या कुटुंबाला गेले काही महिन्यात अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी, माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्या ओळ्खीतील एक बाबा असून, तुमचे दागिने त्यांच्याकडून मंत्रून आणतो. मंतरलेले दागिने तुम्ही परिधान केल्यावर तुमची सर्व संकटे दूर होतील, असे सांगून विश्वास संपादन करत सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ते परत न करणाऱ्या सुभाष बाबासाहेब सुर्वे (वय, ४९ रा. विश्वशांती संकुल, अभुदय नगर, दैवज्ञ भवन जवळ नाचणे) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संशयीत सुभाष सुर्वे हा रिक्षा चालक असून नियमित भाडेकरुनचा विश्वास बसल्यानंतर तो फसवणुकीची संधी साधत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

प्रसाद शंकर मराठे (वय ४२, रा. बिल्वमंगल सोसायटी, उत्कर्ष नगर कुवारबाव) यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, अभुदयनगर येथील रिक्षा व्यावसायिक सुभाष सुर्वे हा कुवारबाव परिसरात रिक्षा व्यवसाय करतो. अनेक वेळा प्रवासी त्याच्या रिक्षेतून गेल्यानंतर त्यांचाही सुभाषवर विश्वास बसतो. अशा विश्वास बसलेल्या प्रसाद मराठे व साक्षीदार सौ. प्राची महेश आखरेकर यांना सुभाष सुर्वे याने तुमच्या घरात अनेक अडचणी आहेत. याची मला माहिती आहे. माझ्या ओळ्खीचे बाबा आहेत. ते ही संकटे दूर करतील. त्यासाठी देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेतले.

सोन्याचे दागिने व रोख रक्कम काम झाल्यानंतर परत आणून देतो असे सांगितले. परंतु वारंवार दागिने मागूनही सुभाष सुर्वे याने ते परत न केल्याने अखेर त्याच्या विरोधात प्रसाद मराठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंविक ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुभाष सुर्वे याने फसवणूक केलेल्या ७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांमध्ये ३ मंगळ्सूत्रे, २ चैन, ८ बांगड्या, ३ अंगठ्या, १ कानातील जोड व रोख दहा हजार रुपये अशा ऐवजाचा समावेश आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी सुभाष सुर्वे याला अटक केली आहे.

                 पोलीसांचे आवाहन

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या रिक्षाव्यवसायिक सुभाष सुर्वे याने घरातील अडचणी किंवा दोष दूर करतो असे सांगून दागिने घेऊन परत केले नसतील. तर अशा नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाशि संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी रत्नागिरीतील जनतेला केले आहे.