बोलेरो-दुचाकी अपघातात १ जण गंभीर जखमी

देवरूख:- देवरूख-संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात कोसुंब फौजदारवाडी येथील तरूण जखमी झाला. या अपघातप्रकरणी बोलेरो चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल मनोहर शेलार (३५, रा. सांगवे लिंगेवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. स्वप्निल शेलार हा बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच- ०८, एपी- १७७८) ही सांगवे ते कोसुबमार्गे साडवली अशी घेवून जात होता. त्याच्यासमवेत ऋत्विक सुहास शेलार हा देखील होता. स्वप्निल शेलार याने बोलेरो वेगात चालवून रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता बोलेरो अचानक वळवल्याने मोटारसायकल (क्र. एमएच-०८, एल- ४८१५) बोलेरो पिकअपवर येवून धडकली. अपघातात मोटारसायकल चालक प्रदीप शंकर गुरव (४२, रा. कोसुंब फौजदारवाडी) हा जखमी झाला. हा अपघात २० रोजी रात्री १०.१५ वा. घडला. प्रदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गुरव याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्वप्निल शेलार यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.