चिपळूणातील ‘केक ऑफ द डे’ला अन्न, औषध प्रशासनाकडून नोटिस

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील केक ऑफ द डे बेकरीमधील अस्वच्छतेचा प्रकार भाजप व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. अन्न व औषध प्रशासनाने या बेकरीच्या भटारखान्याची तपासणी केली. तिथे त्यांना प्रचंड अस्वच्छता आढळली. खराब झालेले केक, पाव आदी पदार्थ जप्त करून नष्ट केले. या बेकरी चालकांना तत्काळ सुधारणा करण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्याबाबत अवगत केल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.

चिपळूण शहरात केक बनविणे व केक विक्रीच्या बऱ्याच बेकरी आहेत. काविळतळी परिसरातील बेकरीमधून उग्र वास येत असल्याचे भाजपा महिला पदाधिकारी राधा लवेकर व काही जागरूक महिलांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान, याची पोलखोल करण्याचा या महिलांनी निर्धार केला. यानुसार बुधवारी संध्याकाळी या भाजप व मनसे महिला पदाधिकारी व जागरूक महिला या बेकरीवर धडकल्या. यावेळी बेकरीच्या किचन रूममध्ये अस्वच्छतेचा कळस पाहून या महिला संतापल्या. बेकरीत कीड लागलेले पाव, उंदराने कुरतडलेले पाव, दुर्गंधी मध्ये बनवले जाणारे केक व बेकरी प्रॉडक्ट्स पाहून साऱ्याच महिला अवाक झाल्या. या बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश या महिलांनी केला. या महिलांनी आठ दिवस आधी संबधित बेकरी व्यवसायिकाला स्वच्छतेबाबत महिलांनी आगावू सूचना दिली होती. तरी त्यामध्ये सुधारणा न केल्यामुळे महिलांनी ही अद्दल घडविल्याचे समजते. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बेकरीच्या भटारखाण्याची पाहणी केली. त्यामध्ये अधिकाऱ्यांना अस्वच्छता आढळुन आली. खराब झालेल्या ब्रेड, पाव, केक, इतर बेकरीच्या वस्तू जप्त करून लगेच ती नष्ट करण्यात आल्या. केक ऑफ द डे बेकरी मालकाला यामध्ये तत्काळ सुधारण करण्याची नोटिस बजावली आहे. एवढेच नाही, तर जे पाच ते सात कर्मचारी आहे, त्यांना स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्याचे ताकीदही अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

केक ऑफ द डे बेकरीबाबत तक्रार आल्यानंतर तत्काळ तपासणी केली. तेथील खराब पदार्थ नष्ट करून यामध्ये सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. – दिनानाथ शिंदे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन