निवळी घाटात बसला ट्रेलरची धडक ; ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरिल निवळी घाटामध्ये ट्रेलर वाहनाने बसला ठोकर दिली. बसचे नुकसान करणाऱ्या संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. उत्तम शिवाजी पारसे (वय३९, रा. हिवरे, ता. जत, जि. सांगली) असे संशयित ट्रेलर चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास निवळी घाटामध्ये घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आपल्या ताब्यातील बस (क्र. एमएच-४० एन ९६४२) घेऊन चिपळूण ते रत्नागिरी असे येत होते. निवळीतील मोठ्या वळणावर ट्रेलर बंद पडलेला होता म्हणून बस चालकाने १० फुट अंतरावर बस ट्रेलरच्या मागे थांबविली होती. मात्र हातखंबा ते निवळी जाणाऱ्या ट्रेलर (क्र. एमएच-०४ जे. के. १५४८) वरिल संशयित चालक पारसे यांनी बसला ड्रायव्हरच्या बाजूला ट्रेलरने धडक दिल्याने बसचे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.