चिपळुणातील जुन्या पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

ny

चिपळूण,:- शहरातील ब्रिटिश कालीन व जुने पूल भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर हद्दीतील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या बांधकाम विभागाने हालचाली सुरु केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे पत्राद्वारे सुचविले आहे.

तीन वर्षापुर्वी शहरातील बहादूरशेखनाका येथील ब्रिटीशकालीन वाशिष्ठी पूल भर पावसात खचल्याची घटना घडली होती. महापूरातच या पुलाची तातडीने डागडुजी करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. त्यावेळी जुन्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा उपस्थित झाला होता. तालुक्यातील व शहर हद्दीतील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. परंतू त्यानंतर काही कालावधी नंतर मुद्दा मागे पडला आणि त्याकडे दुर्लक्ष झाले. याबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी विशेष लक्ष घालत शहर हद्दीतील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शहरातील काही पुलांची यादी रत्नागिरी पॉलिटेक्निक्सकडे सादर केली आहे. तसेच काही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहेत. विशेषतः रत्नागिरी पोलीटेक्निककडे चिंचनाका शिवनदी पूल, देसाई मोहल्लाकडे जाणारा शिवनदी पूल, बाजारपेठ नाईक कंपनी जवळील वाशिष्ठी पूल, गोवळकोट मगर पॉईंट पूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पागमळा शिवनदी पूल, उक्ताड बायपास वाशिष्टी पूल, एन्रॉन बायपास वाशिष्ठी पूल, गांधारेश्वर वाशिष्ठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. शहरातील या पुलांवरून सातत्याने वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या पुलांचे चिपळुणातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.

सद्यःस्थितीत जुन्या पुलांची तपासणी केली असता ते सुस्थितीत दिसत असले तरी भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरसकट सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव रत्नागिरी पॉलिटेक्निक्सकडे सादर केला आहे.विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण