सेना ठाकरे गटाकडून बंड्या साळवी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेचे संभाव्य उमेदवार

रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत विद्यमान तालुकाप्रमुख, माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. रविवारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना नेत्यांनीही श्री.साळवी यांना उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे बंड्या साळवी उबाठाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे.

गेली 15 वर्षे रत्नागिरी तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून काम करताना श्री.बंड्या साळवी यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार उदय सामंत असतानाही श्री.साळवी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती बहुमताना शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. त्यानंतर ना.सामंत हे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही निवडणुकीत प्रचाराची रणनिती आखण्याचे श्री.साळवी यांनी केले होते. त्या निवडणुकीतही ना.सामंत यांच्या मताधिक्क्यात श्री.साळवी यांचा मोठा वाटा होता.

ना.उदय सामंत हे ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर श्री.साळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवार खा.नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळालेले असताना श्री.साळवी हे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मताधिक्य देण्यात यशस्वी ठरले होते. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसा मतदारसंघातून सुमारे 11 हजारचे मताधिक्य श्री.विनायक राऊत यांना मिळाले होते. त्यामुळे ना.सामंत यांच्या बालेकिल्ल्यात बंड्या साळवी यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या मताधिक्याचे बक्षीस म्हणून श्री.साळवी यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मिळणार असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगितले जात आहे.