रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपल्याला मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत आपला पराभव झाला तरीही कार्यकर्त्यांनी खचून न जाता येणाऱ्या विधानसभा, विधान परिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोमाने काम करून पुन्हा यश खेचून आणा असे आवाहन शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
रविवारी मराठा भवन हॉल येथे श्री.राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. धनशक्तीमुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले ही वस्तुस्थिती आहे. मुस्लीम समाज संपूर्ण ताकदनिशी आपल्या पाठिशी उभा राहिला ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला मिळालेल्या मतांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मी स्वतः त्यांची भेट घेऊन आभार मानणार असल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आहे. प्रत्येक मतदाराचा शोध घेऊन त्याला मतदान केंद्रावर आणण्याची जबाबदारी आपली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.रमेश कीर यांना विधान परिषदेत पाठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे तेवढ्याच जोमाने शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन श्री.राऊत यांनी केले.
महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. आपल्या पराभवाचा बदला या निवडणुकीत आपल्याला घ्यायचा आहे. जिल्ह्यातील पाचही आमदार महाविकास आघाडीचे असतील असेही श्री.राऊत यांनी सांगितले. आपला पराभव झाला असला तरीही आपण कायम रत्नागिरी, सिंधुदुर्गातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणार असून आपले कार्यालयही पूर्वीप्रमाणे सुरू राहील असे श्री.राऊत यांनी सांगितले.