..तर त्यांचा बॅनर माझ्या घरावरही लावला असता: ना. सामंत

रत्नागिरी:- माझ्या पाली गावात नारायण राणे यांचा बॅनर लागल्याचे आपल्याला दु:ख नाही आणि मनालाही लागले नाही. ज्यांनी बॅनर लावले त्यांनी आपल्याकडे दहा बॅनर पाठवले असते तर मी घरावरही लावला असता असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कणकवलीमध्ये लागलेला बॅनर हा काही उत्साही कार्यकर्त्यांनी लावला होता. तो बॅनर नंतर हटवण्यात आला. त्याबाबत आपण स्वत: आमदार नितेश राणे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यानंतर कणकवलीत बॅनर लागले तसे अगदी माझ्या पाली गावात घराकडे येणार्‍या रस्त्यासमोरही बॅनर लावण्यात आला. मात्र त्याचे दु:ख आपल्याला नाही. हे बॅनर लावणार्‍यांनी दहा बॅनर माझ्याकडे पाठवले असते तर ते आपण संपूर्ण रस्त्यावर आणि घरावरही लावला असता असे त्यांनी सांगितले. आपण छोटे कार्यकर्ते आहोत, नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत. आता ते रत्नागिरीचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो असलेला बॅनर लावल्याने दु:ख वाटण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.