मंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवाशाच्या सामानाची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मंगलोर सुपर फास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हॅण्डबॅग मधील रोख रक्कम १० हजार व मोबाईल व चाव्या चोरट्याने पळविल्या. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ मे सकाळी चार ते पाच च्या सुमारास मंगलोर सुपर फास्ट एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रेल्वेने मुंबई ते कणकवली असा प्रवास करत असताना चोरट्याने रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान त्यांच्याकडील हॅण्डबॅगेतील रोख रक्कम १० हजार, मोबाईल व चाव्या पळविल्या. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.