जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक; पावसाळ्यात गावचा संपर्क तुटणार

रत्नागिरी:- जिल्हा आणि तालुक्यांशी गाव, वाडी-वस्ती जोडणाचे काम साकव करतात. परंतु जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनल्यामुळे ती वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतला आहे. या साकवांच्या दुरूस्तीला ४ कोटी ७९ लाख खर्च अपेक्षित आहे. यामुळे अनेक वाडी-वस्तीचा दळणवळणाच्यादृष्टीन संपर्क तुटणार आहे. तेथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दऱ्या,खोऱ्याचा, कडे कपारीचा जिल्हा आहे. अनेक दुर्गम भागा असून त्या भागातील वाडी, वस्तींनी जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. मोठा वहाळ, नदी, नाले, दऱ्यांवर ही साकव आहेत. साकवांमुळे या वाड्या वस्त्या तालुक्याला जोडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मुलांना शाळ, कॉलेजला जाण्यासाठी, दळणवळण, शेती-भातीला या साकवांचा वापर होते. ग्रामीण भागात साकवांना मोठे महत्त्व आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनले आहेत. त्यामुळे वाहतुकीस हे साकव बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. चिपळुण तालुक्यात सर्वांत जास्त ९ साकवांचा समावेश आहे. सर्व साकवांच्या दुरूस्तीसाठी ४ कोटी ७९ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे त्या-त्या वाडी, वस्तीमध्ये दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून लवकरात लवकर ही साकव दुरूस्त करून वाहतुकीस खुली करावी, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.