रत्नागिरी:- आर्जु टेक्सोल कंपनीच्या अन्य दोन संचालकांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पाठवण्यात आलेली तपास पथके परतली असून, पोलिस विभाग आता तांत्रिक मुद्द्यावरून त्यांचा शोध घेत आहे. यापूर्वी संजय केळकर आणि प्रसाद फडके या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
यासंदर्भात आतापर्यंत जवळपास ४०० जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून फसवणुकीची रक्कम ५ कोटींवर गेली आहे. कंपनीची फसवणुकीची व्याप्ती मोठी असून अन्य आरोपींच्या शोधासाठी दिल्ली, पूण्यात गेलेली पथके आता परतलेली असून अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे. या कंपनीच्या वेगवेगळ्या स्किममध्ये रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातील कुडाळ, सांगली, मिरज, पुणे येथील नागरिकांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी कुडाळ येथे १३९ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसाद फडके आणि संजय केळकर बरोबरच अन्य ५ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आता दिवसेंदिवस तक्रारदारांची संख्या वाढत असून अन्य संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस विभाग आता तांत्रिक मुद्दयांचा वापर करत असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.