मुंबईहून गावी येणाऱ्या कारचा अपघात; सहा प्रवासी जखमी

खेड:- मुंबईहून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्याच्या कारला मोठा अपघात झाला आहे. खेड तालुक्यात महाळुंगे येथे हा अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी, १२ जून रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. कार चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात कारमधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तेथील स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्त आपल्या गावी खेड आंबवली येथे हुंडाई कारने चालले होते त्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे कारमधील पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला, एक युवक तर अन्य दोन इसम यांचा समावेश आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर खेड कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. खेड पोलिसांनी कळंबणी येथील रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलिसांनी दुपारी उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात केली. मात्र, या अपघातातील जखमींची नावे दुपारी उशिरापर्यंत समजू शकलेली नाहीत.
काही दिवसांपूर्वी, मध्यप्रदेशच्या राजगढ येथे एक मोठा अपघात घडला होता. ज्यात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला होता. या अपघातात १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ज्यामध्ये ४ लहान मुलांनी आपला जीव गमवाला होता तर तर १५ जखमी झाले होते.