उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा

वाहन मालकाला ३७ हजार ५०० रुपयांचा दंड

रत्नागिरी:- रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंडल अधिकाऱ्यांनी कारवाई करत पांढरा समुद्र येथे वाळू भरलेले मालवाहू वाहन पकडले. या वाहनात पाऊण ब्रास वाळू सापडली आहे. मालकाला ३७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहरातील पांढरा समुद्र ७ जूनला मॉर्निंग वॉकला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या समुद्रकिनाऱ्यावर मोबाईलवर शूटिंग करत होत्या. त्यावेळी समुद्रावर वाळूमाफिया वाळू चोरत होते. त्यांना संशय आला की उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आहे. त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल हिसकावण्यासाठी वाळूमाफिया पुढे येताच नॅशनल कराटे चॅम्पियन असलेल्या हर्षलता गेडाम यांनी एक किक मारून त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर दुसरी व्यक्ती फावडे घेऊन त्यांच्या अंगावर आली. त्यांनी त्याचा हल्ला चुकवून त्यालाही खाली पाडले. या हल्ल्याची त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गेली अनेक वर्षे पांढऱ्या समुद्रावर सुरू असलेल्या वाळू उत्खननाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यांना या घटनेनंतर जाग आली आहे. मंडल अधिकाऱ्यांनी पांढरा समुद्र येथे वाळू भरलेले वाहन पकडले. मालक राजेश सहदेव राडये याला महसूल विभागाने नोटीस बजावत ३७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या वाहनात पाऊण ब्रास वाळू सापडली आहे.