जिल्ह्यात चार महिन्यात १४० अपघातांमध्ये ४९ जण मृत्युमुखी

रत्नागिरी:- सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ जीवघेण्या अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३९ गंभीर अपघातांमध्ये ९१ गंभीर झाले आहेत. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.

बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण गेल्याने किंवा झोप अनावर झाल्याने होतात. वाहनचालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे, महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे गतवर्षापासून अपघातांची संख्या घटली आहे.

मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अति वेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, या प्रमुख कारणांमुळे अपघात होत असतात. जानेवारी ते एप्रिल २०२४ या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४० अपघात झाले. या अपघातांमध्ये ४८ जीवघेणे,९१ गंभीर आणि ८३ किरकोळ तर २० विना जखमी अपघातांचा समावेश आहे.

४९ ठार, ९१ जखमी

गेल्या ४ महिन्यात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ अपघातांमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अपघातांमध्ये ९१ गंभीर तर ८३ किरकोळ जखमी झाले.