गणपतीपुळे समुद्रात चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

गणपतीपुळे:- गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अजित धनाजी वाडेकर (वय वर्षे २५) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन तरूणांना वाचविण्याची कामगिरी स्थानिक जीवरक्षक, येथील व्यावसायिक व गणपतीपुळे पोलिसांच्यावतीने करण्यात आली.

गणपतीपुळे येथे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील इसबावे या ठिकाणाहून अजित धनाजी वाडेकर (२५), अजय बबन शिंदे (२३), सार्थ दत्तात्रय माने (२४) व आकाश प्रकाश पाटील (२५) असे चार तरूण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते.

यावेळी या तरूणांनी प्रथम देवदर्शन न करता गणपतीपुळे समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे चारही तरूण समुद्राच्या पाण्यात उतरले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यातील अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात जाऊन अडकला. यावेळी अजित याला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येता त्याच्या बरोबर असलेल्या तरूणांनी व समुद्राच्या पाण्यात असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ही बाब समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक व सध्या गर्दीचा हंगाम असल्याने गस्तीवर असलेल्या गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेड हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्कळ क्षणाचा ही विलंब न लावता गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांना पाचारण करून समुद्राच्या पाण्यात पाठवले. यावेळी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे, आदींसह गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उडया घेऊन समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरूणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरूणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक व पोलिसांच्या मदतीने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी अजित याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी मृत घोषित केले.

या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबिय नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूर क्षेत्राच्या वतीने देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान, सध्या गणपतीपुळे येथे उन्हाळी पर्यटन हंगाम गर्दी ने गजबजत असून विविध ठिकाणांहून आलेले पर्यटक समुद्राच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरतात. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चालला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे- जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. एकूणच गणपतीपुळे येथे मे महिन्यचा उन्हाळी पर्यटन हंगाम अतिशय चांगल्याप्रकारचा गेला होता. या ठिकाणी गेल्या महिन्याभरात कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील जलक्रीडा व्यवसाय सुरू असल्याने असल्यान गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जलक्रीडा व्यवसाय मे महिन्याच्या अखेरीस बंद झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी आणि जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे. परंतु गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर जरी जलक्रीडा व्यवसाय आता बंद असले तरी आलेल्या भाविक व पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिक व जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.