चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड; परतीचा प्रवास पंधराशे रुपयांवर

रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपून आता चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांची आरक्षणे फुल झाली आहेत. अशावेळी खासगी बस हा एकमेव पर्याय चाकरमान्यांसमोर उभा रहातो. खासगी बसवाल्यांनीही लूटमार सुरू केली आहे. रत्नागिरी ते मुंबई स्लीपर गाडीचे तिकिट चक्क १५०० रूपये आहे. नॉन-एसी चेअर चे तिकिट चक्क ९०० रूपये आहे. या अवास्तव तिकिट दराकडे प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अशावेळी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगामा संपल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या फुल्ल असल्यामुळे चाकरमानी खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. मात्र त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे.चिपळूण ते हातखंबा दरम्यान अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.याकामामुळेही वाहतूकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अवजड वाहने रस्त्यात आल्यावरही वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू असताना वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सुट्ट्या असल्यामुळे कोकणात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी वाढून वाहतूक कोंडी होत आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.