तांबी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील कोटांबा येथील तांबी नदीत २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २ दिवसापूर्वी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल सचिन मोहिते (२०, पोसरे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा जन्मापासून मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सायंकाळी साहिल याचा चुलत भाऊ सुशिल सुनील मोहिते व वाडीतील सुधाकर लक्ष्मण मोहिते असे कौटांबा येथील तांबी नदीच्या पाण्यात म्हशी धुवत होते. त्याचवेळी साहिल हा नदीच्या किनाऱ्यावर उभा राहून सुशिल यास मी तुमच्याजवळ येवू का, असे विचारत असताना त्यास सुशिल याने पाणी बरेच खोल आहे येऊ नकोस, असे सागितले. मात्र तरीही साहिल हा नदीच्या पाण्यात उतरत असताना त्याचा पाय घसरून तो नदीच्या पडून बुडाला. त्यानंतर तो दिसेनासा झाला. यावेळी गावातील लोकांनी त्याचा नदीत शोध असताना त्याचा मृतदेह आढळून आला.