रत्नागिरी:- सध्या शाळास्तरावर नर्सरी, पहिली, पाचवी व आठवीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. आरटीईसह सर्वच प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात असून, प्रवेश निश्चितीसाठी पालक वर्गाची धावपळ सुरु आहे. ठराविकच शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी पालक आग्रही असल्याने चुरस वाढली आहे.
यावर्षी आपापल्या स्तरावरच प्रवेशप्रक्रिया राबवण्याचे अधिकार शाळांना दिले असल्याने प्रवेश अर्जनोंदणी, प्रवेश अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आदी प्रक्रियेचे वेळापत्रक प्रत्येक शाळेने आपापल्या सोयीने तयार केले आहे. सध्या शाळास्तरावर नर्सरी, पहिली, पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी ठरावीक शाळेसाठी पालक आग्रही राहत आहेत, त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. त्याचबरोबर प्रवेशप्रक्रियेत चुरस वाढत आहे.
काही खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ओळखीचे संदर्भ शोधले जात आहेत. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची भर उन्हात धावपळ सुरु आहे. शाळा प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांची लगबग सुरु आहे. प्रवेशासाठी ठराविक वेळेतच शाळांची कार्यालये सुरु असून, प्रवेश अर्जांची देवाण- घेवाण होत आहे.