दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथे आपल्याच घरामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या भाग्यश्री लोवरे यांचा व्हिसेरा तपासणी करिता पाठवण्यात येणार असल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर लोवरे यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून व्हिसेरा अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
भाग्यश्री लोवरे या एकट्याच घरी रहात असत. त्या समुद्र किनारी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कामदेखील करत असत. त्यांची मुले कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळून आला. शिवाय त्याच्या घरच्या दाराला आतून वा बाहेरून कडी नव्हती. सर्व दरवाजे उघडे होते. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला.
पोलिसांनी घातपात झाल्याची शक्यता फेटाळून लावली असून पोलीस स्थानकात याबाबत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत दापोली पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री लोवरे या आजारी होत्या. शिवाय त्यांना त्या ज्या हॉटेलमध्ये कामाला होत्या त्या हॉटेल मालकाने डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देखील दिला होता व त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी सुट्टी देखील दिली होती. तसेच आपल्या पत्नीसह जाऊन त्यांना त्यांच्या घरी सोडले होते. शिवाय डॉक्टरकडे जाण्यासाठी वैद्यकीय उपचारांकरिता त्यांना काही पैसे देखील दिले होते.
ज्या दिवशी भाग्यश्री लोवरे यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला त्या दिवशी सकाळी हॉटेल मालकाने त्यांना फोन करून वैद्यकीय उपचार घेतले की नाही याची विचारपूस केली होती. यावेळी भाग्यश्री लोवरे यांनी मला डॉक्टरकडे जाणे शक्य नाही डॉक्टरच आपल्या घरी तपासणी करिता येणार असल्याची माहिती दिली.
याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता भाग्यश्री लोवरे यांनी आपल्या आजाराबाबत एका भगताकडे ‘पाहणी’ केली असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. याबाबत देखील पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाय या भगताचा देखील पोलीस शोध घेत आहेत. लवकरच व्हिसेराचा अहवाल येऊन सर्व गोष्टी समोर येतील व या घटने बाबतचा संभ्रम दूर होईल अशी अपेक्षा दापोली पोलीस स्थानकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.