जिल्ह्यात डेडलाईन संपून गेल्यानंतरही डांबरीकरणाची कामे

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनातील विविध विभागांकडून करण्यात येणार्‍या रस्ते डांबरीकरणाच्या कामांची डेडलाईन संपली आहे. डांबरीकरणासाठी 15 मे पूर्वीचे हवामान चांगले असते. त्यानंतर पावसाळी वातावरण तयार होत असल्याने डांबरीकरणाची कामे निकृष्ट होतात. ठेकेदारांनी वेळेत डांबरीकरणाची कामे न केल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.
जिल्ह्यात डांबरीकरणाबरोबरच सिमेंट रस्त्यांची कामेही आता करण्यात येऊ लागली आहेत. पावसाळा संपल्यानंतर 15 ऑक्टोबरपासून रस्ते डांबरीकरण कामांना सुरुवात केली जाते. साधारण सहा ते सात महिने डांबरीकरणाची कामे केली जातात. प्रशासकीय दिरंगाई किंवा ठेकेदाराकडून होणारा हलगर्जीपणा यामुळे डांबरीकरणाची कामे रखडतात किंवा या कामांना गती मिळत नाही. बर्‍याचदा ठेकेदारांकडून अनेक कामांच्या निविदा भरुन क्षमतेपेक्षा जादा कामे घेतली जातात.

काही ठेकेदारांकडे डांबरी रस्त्यांसाठी आवश्यक साधनसामुग्री नसते. बर्‍याचदा ठेकेदार दुसर्‍याकडून कर्मचारी वर्ग आयात करतात. ‘याची टोपी त्याला’ या प्रकारामुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागतो.
सरकारी यंत्रणा मेहेरबान ठेकेदार आणि काही अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यामुळे रस्ते कामांना मुहूर्त लागत नाही. त्यातूनही रस्त्याचे काम सुरु झाल्यावर ते पूर्ण करण्यास मुदतीपेक्षा जादा वेळ लावला जातो. अशा ठेकेदारांवर कारवाई करण्यापेक्षा सरकारी यंत्रणा मेहेरबान असल्यामुळे त्यांचे अधिक फावते. त्यामुळे जिल्ह्यात रस्त्यांची अनेक कामे रखडलेली पहायला मिळतात.

रस्ते डांबरीकरण हे 15 ऑक्टोबर ते 15 मे यादरम्यानच केले जाते. त्यानंतर पावसाळी वातावरण तयार होते. वळीव पाऊस मुक्कामी असतो. डांबरीकरणासाठी आवश्यक ऊन मिळत नाही. सतत सावली आणि पावसामुळे नव्या रस्त्यावर लगेच खड्डे पडतात. सध्या रस्ते डांबरीकरणाची डेडलाईन संपून गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जिथे कुठे डांबरीकरण सुरु असेल तर ते काम निकृष्ट होणार आहे. त्यामुळे करणार्‍या सर्व संबंधित विभागांनी डांबरीकरणाची डेडलाईन लक्षात घेऊन ही कामे बंद ठेवणे आवश्यक आहे. कामातील दिरंगाई व डांबरीकरणाची डेडलाईन यामुळे रस्त्यांची कामे बंद ठेवावी लागणार आहेत.
नागरिकांमध्ये नाराजी

जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. यापुढे दुरुस्तीचीही कामे करता येणार नसल्यामुळे नागरिकांना यावर्षीही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे. यामुळे अनेक नागरिकांचे हाल होणार आहेत. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.