रत्नागिरी:- टीईटी घोटाळ्यात सहभागी असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात शिक्षक भरतीपासून दूर ठेवण्याचा शिक्षण विभागाने प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा फायदा घेऊन 116 उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी झाले. तसेच या उमेदवारांची शिफारस नियुक्ती याद्यांमध्ये करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी नुकत्या पार पडलेल्या समुपदेशन प्रक्रियेवेळी यापैकी 9 शिक्षक उमेदवार असल्याचे शिक्षण विभागाच्या समोर आले. मात्र, वस्तूस्थिती तपासून संबंधित उमेदवारांची चारित्र्य पडताळणी पोलिसांनी करावी, असे पत्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी पुणे पोलिसांना दिले आहे.
रत्नागिरीत नुकतीच शिक्षक भरती पक्रिया पार पडून त्यासाठी आता समुपदेशनही पार पडलेले आहे. त्यावेळी टीईटी घोटाळ्य़ातील 9 शिक्षक उमेदवार सहभागी झालेले असल्याचे शिक्षण विभाग प्रशासनाच्या समोर आले. हे सर्व उमेदवार परजिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये, असे कळविलेले असल्यो सांगण्यात येत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 2019 व 2018 मधील गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मधील गैरप्रकारामध्ये 7 हजार 874 परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मधील गैरप्रकारामध्ये 1 हजार 663 परीक्षार्थी असे एकूण 9 हजार 537 परीक्षार्थी सहभागी आहेत. संबंधित गैरप्रकारातील परीक्षार्थीची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच त्यांना यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे.
परंतु, त्यातील परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियामध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून समाविष्ट झाले. त्यापैकी काही उमेदवारांची या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे. टीईटी प्रकरणी गैरमार्ग अवलंबिणाऱया उमेदवारांवर गुन्हे नोंदविणेबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. याबाबत सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये, असे कळविलेले आहे. मात्र चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे.
टीईटी घोटाळ्यातील सुमारे 400 उमेदवार न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट झाले. प्रत्यक्षात त्यातील 116 उमेदवारांचा शिक्षक म्हणून निवड यादीत समावेश झाला आहे. या उमेदवारांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र वापरले नाही. तर केवळ बीएड च्या आधारे नववी ते बारावी साठी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवली आहे. तर काहींनी सी-टीईटी च्या आधारे या भरती प्रक्रियेत प्रवेश मिळवला आहे. मात्र, टीईटी घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱयांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सायबर गुह्यात किंवा स्थानिक पोलिसांकडे दाखल झालेल्या गुह्यात सहभागी असणाऱया उमेदवारांचा चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर वस्तूस्थिती तपासून पोलिसांनी निर्णय घ्यावा, असे पत्र राज्य परीक्षा परिषद आयुक्तांनी पोलिसांना दिले आहे