दापोलीतील वणंद येथे सापडला महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

दापोली:- तालुक्यातील कोळथरे येथील मित्राने मित्राचा खून केल्याचा प्रकार ताजा असतानाच तालुक्यातील वणंद येथे एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूने तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. भाग्यश्री लोवरे या महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह तिच्या राहत्या घरातच आढळल्याने नातेवाईकांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. यामुळे दापोली तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील वणंद येथील लोवरेवाडीतील रहिवासी भाग्यश्री दशरथ लोवरे (५०) या आपल्या पतीच्या निधनानंतर घरी एकट्याच रहात असत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून ते कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहेत. मात्र लोवरे या गावीच आपल्या घरी रहात असत. चरितार्थासाठी त्या हर्णेलगत समुद्रकिनारी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. मंगळवारी त्यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह त्याच्या घरी सापडला. या बाबत त्यांचा मुलगा दर्शन दशरथ लोवरे यांने दापोली पोलिसात तक्रार दिली. ज्या दिवशी भाग्यश्री लोवरे यांचा मृतदेह घरी सापडून आला, त्यावेळी बाहेरचा दरवाजा व हॉलचा दरवाजा उघडा होता. त्याला आतून वा बाहेरून कडी लावण्यात आलेली नव्हती. आपली आई घरात एकटीच रहात असल्याने कधीही कडी न लावता झोपत नसे, असेही त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले. यामुळे आपल्या आईचा घातपात झाल्याचा संशय येत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी दापोली पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.