आरटीईअंतर्गत पहिल्याच दिवशी २०६ पालकांचे अर्ज

रत्नागिरी:- आरटीईची प्रक्रिया सुरु, पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्यास त्याच शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. विनाअनुदानित खासगी शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्यातील ८१२ जागांसाठी २०६ पालकांनी आपल्या पाल्यांया प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेद्वारे यावर्षी २०२४‚२५ साठी जिल्ह्यात इ. १ ली साठी रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणीला सुरूवातीच्या टप्प्यात उत्साही किनार लाभली होती. आरटींईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या २ हजार ४३१ शाळांमध्ये यावर्षी जिल्ह्यात एकूण १२ हजार ३४५ जागांवर मेफत प्रवेश दिला जाणार होता. पण दिलेल्या दि. ३० एप्रिल या मुदतीत केवळ ६३१ जणांनी प्रवेश नोंदणी केलेल्या अर्जांपैकी फक्त १३८ जणां अर्ज वैध ठरले. मंडणगड, राजापूर या तालुक्यातून एकही नोंदणी नव्हती.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता. यावर्षात आरटीई प्रवेश प्रकियेतील बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत आदेशाला स्थगिती दिली. शासनाच्या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य मुलांनी इंगÏजी माध्यमांच्या खासगी शाळेची वाट बिकट झाली होती. श्रीमंत मुलांसाठी इंग्रजी माध्यमांची खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी यामुळे झाली असती. मात्र उच्च न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द केला आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त लागला आहे. आता आरटीई प्रवेश प्रक्रियेला राज्यात दि. १७ मे पासून नव्याने सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.