बनावट सोन्यावर कर्ज घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

रत्नागिरी:- राजापुरातील एका घरफोडीची चौकशी करता करता नकली सोन्यावर कर्ज प्रकरणे करून पतसंस्था, बँकांची फसणुक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 7 संस्थांमध्ये 300 तोळे नकली सोने ठेऊन सुमारे साडे 3 कोटी 50 लाखाचे कर्ज उचल्याचे उघड झाले आहे. यामध्ये कोल्हापूरच्या सोनारासह त्याच्या 3 साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजापुरात काही दिवसांपूर्वीच मोठी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करत होती. या प्रकरणाच्या तपास करत असताना पोलिसांच्या हाती 1 संशयित लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलु लागला. घरफोडी बाजूलाच राहीली, आपण नकली सोन्याद्वारे अनेक पतसंस्था आणि बँकांची फसवणूक करून कर्ज प्रकरणे केल्याचे पुढे आले. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर हे एक मोठे रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले. चौघांच्या रॅकेटमध्ये कोल्हापूर येथील सोनाराचा समावेश आहे. पावस, तुळसंदे या ठिकाणचे त्याचे अन्य साथीदार आहे. कोल्हापूर येथील सोनाराकडे जाऊन नकली दागिन्यांना सोन्याचा मोलामा दिला जात होता. बँका किंवा पतसंस्थेचे सोनार, दागिना दगडावर घासून भिंगाने तपासून घेतात. पूर्वी प्रमाणे तुकडा पाडला जात नाही. यामध्ये हे सोनार फसले. त्याचा फायदा उठवत गेल्या वर्षभरात या टोळीने भंडारी खारवी समाज पतसंस्था, मलकापूर अर्बन बँक, खंडाळा अर्बन, राजापूर कुणबी पतसंस्था, पावसमधील बँक ऑफ इंडिया, मिठगवाणे श्रमीक पतसंस्थेमध्ये ही कर्ज प्रकरणे केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या चौकटीने साडे 300 तोळे नकली सोने गहाण ठेऊन त्यावर 3 कोटी 50 लाखाचे कर्ज उचलल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. गुन्हे शाखेने कोल्हापूर येथील अमोल पोतदार यांच्यासह त्यांचे साथीदार योगेश सुर्वे (रा. तुळसंदे), अमेय पाथरे (पावस) व प्रभाकर नाविक या चौघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलीस सवालदार आंबेकर, साळवी, कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.