पावणेतेरा हजार निरक्षरांनी असाक्षरतेचा पुसला कलंक

रत्नागिरी:- नवभारत साक्षरता उपक्रमाचे जिल्ह्याला चांगले यश मिळाले असून, जिल्ह्यातील पावणेतेरा हजार निरक्षरांनी असाक्षरतेचा कलंक पुसला आहे. महाराष्ट्रात ९२.६८ टक्के उत्तीर्ण, तर ७.३२ टक्के ‘सुधारणा आवश्यक’ आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, प्रशासनिक अशा विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील १२ हजार ७१९ जणांनी असाक्षरतेचा कलंक पुसला पुसून टाकला. आता हे सर्वजण साक्षरतेचे बिरुद आपल्या नावाबरोबर अभिमानाने मिरवणार आहेत. केंद्राच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आलेल्या चाचणीचा निकाल ६ मे रोजी जाहीर झाला. महाराष्ट्रात ९२.६८ टक्के इतके नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत, तर ७.३२ टक्के नवसाक्षरांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला आहे. २०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत है अभियान राज्य शासनाच्या मदतीने केंद्र शासनाने राबवले आहे.

जिल्ह्यात १३ हजार ४७० राच्या दुर्गम परीक्षार्थी उल्हास उपक्रमात सहभागी झाले होते. निकालामध्ये एकूण १२ हजार ७१९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील पुरुष २ हजार १६७ सांख्यिकी तर महिला १० हजार ६२४ परीक्षार्थी आहेत. तसेच सुधारणा आवश्यक असलेल्या परीक्षार्थी मध्ये पुरुष ८५, महिला ५९४ असून ६७९ एकूण परीक्षार्थी आहेत. जिल्ह्यातील नवसाक्षर बंधू-भगिनीनी निरक्षरतेचा कलंक पुसून एका चांगल्या बाबीची सुरुवात केलेली असून भविष्यात जिल्हा १०० टक्के साक्षर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू, असा विश्वास शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी व्यक्त केला.