देवरुख:- देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र बारगुडे आपली हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक (एमएच ०८ एएफ १९५७) घेऊन देवरुखातून किरडूवेला निघाले होते. त्यांच्यासोबत प्रवीण बारगुडे हे मागील सिट वरती बसले होते. सुतारवाडी थांव्यानजीक बारगुडे बंधू यांची दुचाकी आली असता रत्नागिरीहून देवरुखकडे येणारी झेन कार गाडी क्रमांक (एमएच ०८ सी ७४९१) या झेन कारने राँग साईडने समोरून दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महेंद्र बारगुडे यांना जोराचा मार बसला.
अपघाताचे वृत्त कळताच महेंद्र व प्रवीण यांना दवाखान्यात आणण्यात आले. मात्र महेंद्र बारगुडे यांचे देवरुख ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. तर प्रविण यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलिस उपनिरिक्षक नामदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद दाखल करण्याचे काम सुरू होते. महेंद्र बारगुडे यांच्या शवाचे विच्छेदन देवरुख ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत. महेंद्र बारगुडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील भाऊ व दोन मुले असा परिवार आहे.