मतदान करून परतणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी फाटा येथे मतदान करून घरी परतत असणाऱ्या मोहिनी मधुकर केळकर या ५८ वर्षीय महिला मंगळवारी सिलिंडरच्या भरलेल्या गाडीने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा कराड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मोहिनी केळकर खेर्डी फाटा येथे पतीसह रहात होत्या. मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास त्या मतदान करून आल्या. तब्येत बरी नसल्यामुळे मतदान झाल्यानंतर खेर्डी फाटा येथे दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घेतले. त्यानंतर घरी परतत असताना रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या सिलिंडर भरलेल्या गाडीने केळकर यांना धडक दिली. या धडकेमुळे केळकर या रस्त्यावर जोराने आपटल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथे लाईफ केअर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने कराडला हलवण्यात आले. कराड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. केळकर यांचा मृत्यू कराड येथे झाल्याने कराड पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे. तेथून ही नोंद दापोलीकडे वर्ग करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.